top of page

गर्भसंस्कार - काळाची गरज

Garbh Sanskar

गर्भसंस्कार किंवा गर्भाधानसंस्कार हे सोळा संस्कारांपैकी एक संस्कार आहे. काळाच्या ओघात गर्भसंस्कारविषयी ची महती कमी होत गेली व आजकालच्या आधुनिक युगात गर्भसंस्कार हे समाजाला दाखवण्यापुरते किंवा फॅशन म्हणून केले जातात.

गर्भसंस्काराबद्दल समाजात जनजागृती होताना सहसा दिसत नाही. याचे कारण गर्भसंस्काराची गहणता समाजाला समजली नाही. काही जणांकडून मी ऐकले व पाहिले आहे की पुस्तक वाचुन, यु-ट्यूबर काही पाहून किंवा काही दिवस एखाद्या गर्भसंस्कार केंद्रात जायचे व तिथे काही दिवस राहिले की आपले गर्भसंस्कार पुर्ण झालेत, अशा संकल्पना आहेत.


गर्भसंस्कार हा खूप मोठा विषय आहे व त्याची व्याप्ती मानवी मन व संस्कार या सोबत निगडित आहे. गर्भधारणा झाल्यापासून ते प्रसुती होईपर्यंत चालणारा हा प्रवास आहे, जो काही दिवसात पुर्ण होऊ शकत नाही. गर्भधारणा झाली की नाही हे समजण्यासाठी साधारणपणे दिड ते दोन महिन्यांचा कालावधी जातो. म्हणजे उरलेले सात महिने अखंड चालणारा हा प्रवास आहे.


गर्भसंस्कारात गर्भवतीची दिनचर्या कशी असावी, आहार विषयी सल्ला, गर्भसंवाद, औषधोपचार, व्यायाम, ध्यान, घरातील वातावरण, स्व:ताची विचारधारा कशी असावी, वाचन काय करावे इत्यादी बाबी येतात. यात सर्वात महत्वाच्या बाबी आहेत - घरातील वातावरण, स्व:ताची विचारधारा कशी असावी व गर्भसंवाद.


घरातील वातावरण गर्भवतीसाठी व बाळासाठी फार महत्त्वाचे असते. घरातील वातावरण जर ताण-तणावाचे, वाद-विवादाचे, मतभेदाचे व सतत संघर्ष कलह असेल तर गर्भसंस्कार कसे करणार? या आधुनिक युगात टिव्ही, मोबाईल चा रोजच वापर होत असतो. या उपकरणांवर नको असलेले कार्यक्रम पण सहज दिसतात. त्यामुळे घरातील वातावरण बिघडते म्हणून त्याचा वापर कटाक्षाने टाळावा. गर्भसंस्कारासाठी घरात शांतता व सात्विकता असावी.


गर्भवतीची स्व:ताची विचारधारा कशी आहे यावर बाळाची मानसिकता व संस्कार अवलंबून राहतात. स्व:तच्या मनात राग, द्वेष, संशय, कट कारस्थाने असतील तर बाळ कसे चांगल्या विचारांचे होईल? किमान सात महिने तरी गर्भवतीने सात्विकता मनात धारण करावी. बाळाची नाळ केवळ आईच्या गर्भाशी जोडलेली नसून तिच्या विचारांशी जोडलेली आहे. पुढील महत्त्वाची बाब म्हणे गर्भसंवाद.


गर्भसंवाद - म्हणजे आईने गर्भातील बाळासोबत केलेला संवाद. काही जणांना याचे आश्चर्य वाटू शकते की गर्भातील बाळासोबत कसे बोलावे व त्याला/तिला काय समजणार? आणि त्याला/तिला काही समजले आहे हे गर्भवतीला कसे कळणार? यातच गर्भसंस्काराचे गुपित आहे. योग्य मार्गदर्शन मिळेल तर हा अनुभव गर्भवतीला नक्की येतो, हे मी पाहिलेले आहे. अगदी घरातील इतर मंडळीचे बोलणे देखील बाळ ग्रहण करत असते (म्हणून घरातील वातावरण चांगले असावे). बाळासोबत घरातील इतर मंडळी ही संवाद साधू शकतात. गर्भातील झोपलेल्या बाळाला उठवून त्याच्या अंतर्मनात चांगल्या विचारांचा ठसा उमटवणे म्हणजे गर्भसंस्कार. गर्भवतीला जेव्हा बाळ झोपले आहे की जागे आहे याची जाणीव होईल तेव्हाच गर्भसंवाद घडू शकतो. या साठी जेम्स निकोलस सरांचा "दैदीप्यमान बालकाचा जन्म" ऑडियो संच फार उपयुक्त आहे. माझे पहिले पुस्तक 'हुशार मुले जन्मतील' यात बरेचसे जिवंत अनुभव दिले आहेत.


पुर्वी सारखे सुसंस्कृत व चांगले वातावरण या कलियुगात राहिले नाही म्हणून सुसंस्कृत व हुशार मुलांना जन्म देण्यासाठी मार्गदर्शनाखाली गर्भसंस्कार ही काळाची गरज आहे. योग्य वेळी गर्भसंस्काराचा निर्णय तुमच्या घराण्याचे भविष्य उज्ज्वल करणार आहे. समाजाने या विषयाची गंभीर दखल घ्यावी असे माझे प्रांजल मत आहे.



Dr Umesh Doshi

डॉ. उमेश दोशी

माणगाव - रायगड

मो. ९२२६७९५०९०

 
 
 

Comments


bottom of page